Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 12:09 PM2022-06-04T12:09:50+5:302022-06-04T12:10:33+5:30

Rajya Sabha Election 2022: भाजपचे चारित्र्य उघड होत असून, कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena sanjay raut criticised bjp and said maha vikas aghadi candidates will win in rajya sabha election 2022 | Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार, भाजपने पैसा फुकट घालवू नये”: संजय राऊत

Next

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशीही कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून, याचा नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले असून, राज्यसभेच्या सर्व ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असून, भाजपने आपला पैसा फुकट घालवू नये. तो सत्कार्यात लावावा, असा खोचक टोला लगावला आहे. 

भाजपने राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार दिल्यापासून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी भाजपला घोडेबाजार करायचा आहे, असा आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र, भाजप कोणताही घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीला घोडेबाजाराची भीती वाटत असेल, तर त्यांनी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रतिआव्हान भाजपने दिले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणीच माघार न घेतल्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. 

अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीने सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणे आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणे उकरुन काढत त्रास दिला जात आहे. यात भाजपचे चारित्र्य उघड होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

राज्यसभेच्या ४ जागा महाविकास आघाडी जिंकणार

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावे. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला. 

कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेत जातील. आम्ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचे वातावरण खराब करायचे आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे १० जूनला कळेल. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे १० तारखेलाच कळेल, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, विधानसभेत लहान पक्षांचे १६, तर अपक्ष १३ आमदार आहेत. ते कोणासोबत जातील यावर निकाल अवलंबून असेल. बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, मनसे १, रासप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, जनसुराज्य पार्टी १, शेतकरी कामगार पक्ष १ आणि कम्युनिस्ट पक्ष १ असे लहान पक्षांचे संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत:चे दोन, तर शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे, पण तिसऱ्या व दुसऱ्या जागेसाठी  इतरांची मदत लागेल.
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp and said maha vikas aghadi candidates will win in rajya sabha election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.