“यांच्यासारखे ढोंगी नाहीत, नवे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही”; संजय राऊत संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:04 PM2022-07-15T12:04:21+5:302022-07-15T12:05:21+5:30
Maharashtra Political Crisis: हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करत आहात असे विचारत होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आधीच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावलेला आहे. यातच औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, खासदाय संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरेंशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचे खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय हे विचारत होते
हेच भाजपावाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करत आहात असे विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दि. बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसेच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
दरम्यान, हे निर्णय बदलून काय साध्य केले हे फडणवीस यांना विचारायला हवे, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय असा घणाघात त्यांनी केला.