Sanjay Raut: “हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:55 PM2022-04-18T16:55:00+5:302022-04-18T16:56:01+5:30
Sanjay Raut: भाजपवाले आता आम्हाला हिंदूत्व शिकवणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई: मनसेच्या पाडवा मेळावा तसेच उत्तरसभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद अद्यापही राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा यांवरून विरोधक राज ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आता हाती घेतला असून, याला भाजपचा पाठिंबा असल्याचा दावाही केला जात आहे. या एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे.
मशिदींवरील भोंग्याबाबतचा मुद्दा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलो, तरी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही. भाजपच्या हिंदुत्वाचा प्रकार वेगळा आहे. शिवसेनेचे हिंदुत्व अंतरात्म्यातून आले आहे. यात राजकीय फायदा तोट्याचा प्रश्न नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तो कधीही केला नाही. शिवसेनेने हिंदुत्वासाठी नेहमी त्यागच केला आहे. हिंदुत्वासाठी त्याग करायला शिवसेना सदैव तत्पर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९च्या मुलाखतीत बोलत होते.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
- आमचा हिंदुत्वाचा लढा अयोध्येपासून सुरू झाला
- राजकीय स्वार्थासाठी अशांतता निर्माण करणे चुकीचे
- १९९४ चं चित्र आता महाराष्ट्रात दिसत नाही
- हिंदुत्वाबाबत शिवसेनेची फरफट झाली नाही
- भाजपवाले आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?
- केंद्राकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे
- आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
- ईडी आणि सीबीआयची प्रतिष्ठा भाजपने धुळीस मिळवली.
- अनिल देशमुख यांच्या घरावर २०० छापे टाकण्याएवढे काय होते. सहा वर्षांच्या नातीची चौकशी केली.
- न्यायालयाकडून सातत्याने एकाच पक्षाच्या नेत्यांना दिलासा मिळतोय, अशी परिस्थिती आहे.