राज्यसभेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंना धक्का; भाजपही प्रतिकूल
By यदू जोशी | Published: May 18, 2022 10:16 AM2022-05-18T10:16:44+5:302022-05-18T10:18:24+5:30
राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा असे खुले पत्र संभाजीराजे यांनी लिहिले आहे.
यदू जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी सहावे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे म्हटले जात असले तरी त्या बाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यातच शिवसेनेने सहावी जागा लढविण्याची घोषणा केल्याने बिनविरोध निवडून येण्याच्या संभाजीराजेंच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीकडील अतिरिक्त ११ मते संभाजीराजे यांना देण्याचे सूतोवाच शरद पवार यांनी केले होते. तथापि, दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने आम्हाला मदत केली होती. यावेळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्षांकडील अतिरिक्त मते लक्षात घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना पाठिंबा मिळण्याबाबत संभ्रम आहे. त्यातच सहावी जागा शिवसेना लढणार असल्याचे मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्याने शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्षांना विश्वासात न घेता परस्पर संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेता कामा नये, असे शिवसेना आणि काँग्रेसच्याही नेतृत्वाला वाटते. त्यामुळेच शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिल्याच्या वृत्ताने अस्वस्थता आहे. शिवसेनेने स्वत:चा उमेदवार उभा करावा आणि राष्ट्रवादीने अतिरिक्त मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला देऊन आघाडीधर्म पाळावा. काँग्रेसकडील दोन अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या बळावर आपला दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो, असा तर्क शिवसेनेत दिला जात आहे.
संभाजीराजेंचे आमदारांना पत्र
राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा असे खुले पत्र संभाजीराजे यांनी लिहिले आहे. आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत सहावी जागा निवडून आणण्यासाठीचे पुरेसे संख्याबळ कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नाही. सर्व राजकीय पक्षांनी व अपक्ष आमदारांनी आपल्याला संधी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
भाजपात अंतर्गत सहमती नाही
पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपचे दोन, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्की निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. संभाजीराजे यांना या सहाव्या जागेसाठी पाठिंबा देण्यावरून भाजपत अंतर्गत सहमती नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.