“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:01 AM2024-06-03T09:01:00+5:302024-06-03T09:04:04+5:30
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. यातच राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना मेसेज पाठवत आहेत, असा मोठा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार, मोदीजींनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे त्या खिडकीतून उद्धव ठाकरे येतील. मोदीजींनी आधीच सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब यांचे सुपूत्र म्हणून माझी नेहमी त्यांच्यासाठी एक खिडकी उघडी आहे. मी दाव्याने सांगतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीस दिवसातच उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळच देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीजी आहेत हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असा दावा रवी राणा यांनी केला होता. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना सदर विधान केले आहे.
NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे अनेक लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा दावा करत, महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाले. आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजपप्रणित एनडीए आघाडीची सरशी होत असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असे दिसत आहे. एक्झिट पोलनंतर संजय राऊतांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जा. ते दगड मारतील, असा खोचक टोला लगावत, एक्झिट पोलच्या आकड्यावर जाऊ नका. महाराष्ट्रात शिंदे गटाच्या ११ ते १२ जागा निवडून येतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.