“मनसेला महायुतीतील एका चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव”; शिंदे गटातील नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 09:35 AM2024-03-20T09:35:00+5:302024-03-20T09:35:49+5:30
Deepak Kesarkar Reaction on MNS: मनसेच्या निर्णयाबाबत येत्या एक ते दोन दिवसांत कळेल, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
Deepak Kesarkar Reaction on MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार, यावरून अनेक तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या शक्यतेवरून आरोप-प्रत्यारोप होत असून, मनसेला महायुतीमधील एका चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत दोन जागांचा प्रस्ताव मनसेकडून दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, एकच जागा मनसेला मिळू शकते, असा कयास आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अधिसूचना काढली जात असून, नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यावर भर दिला जात असून, एक ते दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल, अशी चर्चा आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनसेबाबत सदर दावा केला आहे.
महायुतीचं संख्याबळ निश्चित होईल
शिवसेना शिंदे गटासोबत १३ निवडून आलेले खासदार आहेत. तसेच अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाला आहे. त्यांचा एकच खासदार असला तरी आमदारांची संख्या खूप मोठी आहे. लोकसभा मतदारसंघात त्यांचे आमदार आहेत तिथे त्यांच्या पक्षाचा मान ठेवला जाईल. लवकरच महायुतीचे संख्याबळ निश्चित होईल. महायुतीतील तीन मोठ्या पक्षांसह मित्रपक्षांसाठी जागा सोडायच्या आहेत. त्यानंतर भाजपा किती जागा घेणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती घेणार हे निश्चित होईल, असे मला समजले आहे. या घडामोडींमध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग फार कमी होता. त्यामुळे माझ्याकडे एवढीच माहिती आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.
मनसेचा निर्णय एक ते दोन दिवसांत कळेल
महायुतीत मनसेच्या सहभागाबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मनसे महायुतीत सहभागी झाली तर त्यांना रेल्वेचे इंजिन या त्यांच्या निवडणूक चिन्हाऐवजी महायुतीतील एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असा प्रस्ताव महायुतीने राज ठाकरे यांना दिला. कारण महायुतीतील पक्षांचे चिन्ह लोकांना माहिती आहे. त्या चिन्हासाठी आम्ही राज्यभर आधीच प्रचार केला आहे. शेवटी याप्रकरणी अंतिम निर्णय अमित शाह यांनी घ्यायचा आहे. त्याबद्दल काय ठरले, ते मला माहिती नाही. येत्या एक ते दोन दिवसांतच मनसेचा निर्णय समजेल. महायुतीतील अन्य पक्षांचीही जागांची संख्या निश्चित व्हायची आहे. राज ठाकरे किती जागा मागणार, मनसेला किती जागा मिळणार, राज्यातील ४८ जागांमधून त्या वजा केल्यानंतर अन्य जागा बाकीच्या पक्षांच्या वाट्याला येणार. त्यानुसारच महायुतीची संख्या ठरवावी लागेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.