“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:44 IST2024-04-27T15:43:16+5:302024-04-27T15:44:10+5:30
Shiv Sena Shinde Group News: पंतप्रधान मोदी भाजपा उमेदवारांची सभा घेऊ शकले असते, पण ते घटक पक्षातील उमेदवारांची सभा घेऊन एक संदेश देऊ इच्छित आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.

“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा असो किंवा मित्रपक्ष असो अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लागोपाठच्या दिवसांत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यातच महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.
रथाचे सारथ्य कोण करतो, याला खूप महत्त्व असते. श्रीकृष्ण जेव्हा स्वतःहून सारथ्य स्वीकारतात. तेव्हा अर्जुनाच्या हातात केवळ धनुष्यबाण उरतो आणि दिशा देण्याचे काम श्रीकृष्ण करतात. आम्ही रथावर धनुष्यबाण घेऊन उभा राहिलो आहोत. तर आमचे सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे, या शब्दांत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या, तेथील वातावरण बदलले
ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणाचे वातावरण बदलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा प्रचार करत असतील तर त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच याचा परिणाम महाराष्ट्रातील इतर जागांवरही दिसेल. पंतप्रधान मोदी हे भाजपाच्या उमेदवारांची सभा घेऊ शकले असते, पण ते घटक पक्षातील उमेदवारांची सभा घेऊन एक संदेश देऊ इच्छित आहेत, असे धैर्यशील माने यांनी नमूद केले.
दरम्यान, शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत. पण जनता हे कधीही विसरणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.