Maharashtra Politics: “पवारांची चावी कुठेही चालते, काँग्रेस अन् उठोबा-बठोबाला पटवले”; गुलाबराव पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:57 AM2023-03-26T11:57:35+5:302023-03-26T11:58:50+5:30
Maharashtra News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.
Maharashtra Politics: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली आहे. अधिवेशन काळात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच झालेल्या जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले. यावरून शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेनेच्या शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि भाजपचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आणि एकनाथ खडसे तसेच अजित पवारांनी उभा केला उमेदवार पराभूत झाला.
पवारांची चावी कुठेही चालते, काँग्रेस अन् उठोबा-बठोबाला पटवले
यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थिती आम्ही त्यांना साथ दिली, त्यांना १०० टक्के साथ दिली आहे. त्यावेळी आमचे सहा सदस्य आहेत, तुमचे सात आहेत हे त्यांना सांगितले होते. पण यांनी बरोबर सगळे जुळवून आणले. माझा सांगायचा अर्थ असा आहे की, पवार हे कलाकार आहेत. शेवटी ते पवार आहेत. पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. पवारांची चावी कुठेही चालते. त्यांनी बरोबर काँग्रेसवाले पटवले. उठोबा-बठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली, असे सांगत जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असताना गुलाबरावांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला.
दरम्यान, जळगाव जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी आयत्या वेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्यानंतर गुप्त पद्धतीने मतदान पार पडले. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"