“तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड”; शिंदे गटातील नेत्याने अखेर कबुली दिली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:46 PM2023-07-13T19:46:44+5:302023-07-13T19:50:42+5:30
तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Gulabrao Patil News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड होणार असल्याची कबुली शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार सर्वाधिक चर्चीला गेलेला विषय आहे. मात्र अजुनही याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असे मी ऐकतो आहे.
तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात थोडी गडबड
कुणाला काय खात मिळेल हा निर्णय वरिष्ठ ठरवतील. परंतु, तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, खातेवाटपावरुन एकमेकांमध्ये नाराजी राहील, असा दावा करत, अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. मात्र तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित आहे, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.