“राज ठाकरे अन् नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ऑफर होती, परंतु...”: गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 01:29 PM2023-06-21T13:29:52+5:302023-06-21T13:35:38+5:30
आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो, मात्र...; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
Gulabrao Patil: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जातेय असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटले. सुरुवातीला जेव्हा काही आमदार गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना सल्ला देत असेल आणि ते त्याचे ऐकत असतील तर काय होणार. मी तर ३३ नंबरला गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो, असे मोठे विधान राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले.
शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांना पक्षातल्या ४० आमदारांचे पाठबळ मिळाले. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. तसेच वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठीक आहे, परंतु ३५ वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमची बॅक हिस्ट्री चेक करावी. आम्ही घरांवर तुळशीपत्र ठेवून कामे केली आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
राज ठाकरे अन् नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ऑफर होती, परंतु...
गद्दारी करायचीच असती तर नारायण राणेंनी केली तेव्हाच गेलो असतो. त्यावेळी मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे गेले तेव्हाही गद्दारी करू शकलो असतो, परंतु आम्ही तसे केले नाही. यावेळी मात्र विचारांचा विषय आला, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मी त्यांना सांगून गेलो. आत्ता फक्त ११ आमदार सुरतला गेले आहेत. आपण त्यांना परत बोलवा. अजित पवारांना पवारसाहेब परत बोलावू शकतात, आपणही आपल्या नेत्यांना परत बोलावले पाहिजे. आपल्या नेत्याने आपल्या चांगल्या कार्यकर्त्याला गेल्यानंतर परत बोलवायचा प्रयत्न का केला नाही हा माझा सवाल आहे. हा प्रयत्न केला असता तर आमच्यासारख्या लोकांची आणि आमदारांची मने वळली असती. आम्हाला वाटले असते की बाबा हा माणूस प्रयत्न करतोय, पण हीच लोक ऐकत नाहीत. तो प्रयत्न यांनी केला नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंवर गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो तर उलट मलाच सांगितले, तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन दिल चुहे जैसा है, तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतो. हे संजय राऊतांचे वाक्य आहे. या महामंडलेश्वराने शिवसेनेची वाट लावली. त्याच्यामुळेच शिवसेनेला हे दिवस आले आहेत, अशी घणाघाती टीका गुलाबराव पाटील यांनी केली.