“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:38 PM2024-06-20T18:38:24+5:302024-06-20T18:39:13+5:30
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या जागा वाढल्या असत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी झाले ते चांगले झाले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. तसेच अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशावरूनही राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. विधानसभेला १०० जागा दिल्या नाहीत तर सर्व जागांवर आम्ही निवडणुका लढवू, असे रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
अजित पवार थोडे उशीरा आले असते, मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर ती ९ मंत्रिपदे आम्हाला मिळाली असती. आमच्या पक्षाला मिळाली असती. एकनाथ शिंदे यांनी काही जणांना शब्द दिले होता. महाडचे भरतशेठ गोगावले कधीपासून सफारी शिवून तयार आहेत. ते वाट बघत आहेत. २-४ जणांना शब्द दिला होता आणि तो पाळता येत नाही. त्यामुळे अजितदादा उशीरा आले असते तर त्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती. अजितदादांबाबत प्रचंड आदर आहे. ते धाडसी व्यक्ती, प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत. पण अजितदादा आणखी लेट आले असते तर आमच्या शिवसेनेचा फायदा झाला, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. रामदास कदम यांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलो आहोत
आम्हाला १०० जागा द्या, ही विनंतीवजा मागणी आहे. आम्ही ज्या विश्वासाने तुमच्यासोबत आलो, त्यामुळे जेवढ्या जागा तुम्ही घ्या तितक्या आम्हाला द्या अशी मागणी भाजपाकडे आहे. एकनाथ शिंदे यांना १५ जागा लोकसभेच्या मिळाल्या, शिवसेना म्हणून १८ खासदार होते. तेवढ्या जागा मिळायला हव्या होत्या. जागावाटपावेळी जे झाले ते चांगले झाले नाही. रायगड आमचे, रत्नागिरी आमचे, अमरावती आमचीच असे सगळे भाजपाने केले. एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला १०० जागा द्या. अन्यथा सर्वच जागा आमच्या असतील, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महायुतीचा लोकसभेत पराभव का झाला याचे विश्लेषण तीनही पक्षांनी करावे. भाजपाला सर्व्हेचे प्रकरण पटले नसावे. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. भावना गवळी, हेमंत गोडसे नको असे भाजपचे मत होते. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली.