“संजय राऊतांमुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये खदखद, मोठा धोका”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:41 IST2024-12-06T16:40:59+5:302024-12-06T16:41:08+5:30
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: संजय राऊत जे बोलतात, त्यातील एकही गोष्ट खरी होत नाही. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असा खोचक टोला शिंदे गटातील नेत्यांनी लगावला.

“संजय राऊतांमुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये खदखद, मोठा धोका”; शिंदेसेनेतील नेत्याचा दावा
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथबद्ध केले जाणार आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेत प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणे झाले. त्यांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचे लक्षात येत आहे. ही खदखद संजय राऊत यांच्यामुळे आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला.
हा संजय राऊत यांना सावधगिरीची इशारा आहे
उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्याबद्दल खाजगीमध्ये काही सांगतात. त्यांच्या वागण्यामुळे ही वेळ आली आहे. हा संजय राऊत यांना सावधगिरीची इशारा आहे. नाहीतरी आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही. २०१९ च्या निकालानंतर आमदारांची बैठक घेऊन बोट दाखवत तुमच्यापैकी मुख्यमंत्री करणार असं बोलते होते. पण नंतर ते बोट स्वत:कडे फिरले आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्री करायला शिवसैनिक दिसला नाही, या शब्दांत शंभुराज देसाई यांनी निशाणा साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडी कोणी करायला लावली. हे महाराष्ट्राला माहिती आहे. ठाकरे गटाची जी अवस्था झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे ठरले का? १० पैकी एकही वाक्य खरे ठरलेले नाही. आमचे सरकार पडेल असे संजय राऊत म्हणत होते. पडले का? आम्ही पुन्हा आलो. संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने घेऊ नका, असा खोचक टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.