“छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा”; शिंदे गटातील नेत्यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:08 PM2024-01-31T15:08:10+5:302024-01-31T15:09:03+5:30
Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या भूमिकेवरून शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असून, आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. अनेक जण छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. यातच आता शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
मीडियाशी बोलताना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणाले की, छगन भुजबळ हे एक मंत्रिमंडळातील सदस्य आहेत. भुजबळ ज्या पद्धतीने तिरस्काराची भूमिका घेत आहेत, हे योग्य नाही. अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. मंत्रिपदाची शपथ घेताना संपूर्ण राज्याच्या हिताच्या गोष्टी केल्या जातात आणि प्रत्यक्षात मात्र एका समाजाचा तिरस्कार करतात. गेल्या ७० वर्षांपासून तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाहीत, म्हणून हा समाज सोयींपासून वंचित राहिला. आता जर नोंदी सापडत आहेत, तर त्यांना प्रमाणपत्रे देण्यापासून कुणीही अडवू शकत नाही, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याबाबतीत अजित पवार निर्णय घेतील. एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पडत नाही. हे जाहीरपणे सांगतो. ते घेत असलेली भूमिका ना सरकारची आहे, ना राष्ट्रवादीची आहे, असे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावे
संजय गायकवाड यांनी केलेले विधान वैयक्तिक असले तरी, मराठा आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि ओबीसींचा विषय वेगळा आहे. काही लोकांना राजकारण करायचे आहे, नेते बनायचे आहे, आम्ही सगळ्या ओबीसी समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही या समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही त्या समाजाचे पाठीराखे आहोत, ही जी भूमिका घेऊन राजकारण करत आहात, त्यामुळे दोन्ही समाजाच अत्यंत वाईट संदेश जात आहे. मीडियासमोर जाऊन थेट सरकार चुकीचे आहे, असे म्हणत असाल, तर हे योग्य नाही. सरकारमध्ये असून तुम्ही अशी भाषा करत असाल आणि तुमचा राजीनामा मागितला जात असेल, तर त्यात काही गैर नाही, अशी पुष्टी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोडली.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना सांगितली आहे. ओबीसी आरक्षणाला अडचण होणार नाही. छगन भुजबळ यांनी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात, ते मोठे नेते आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विधाने करायला हवीत. छगन भुजबळ यांची विधाने योग्य नाहीत. अन्यथा आम्हालाही तशाच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.