“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:37 PM2024-07-18T13:37:51+5:302024-07-18T13:38:43+5:30
Shiv Sena Shinde Group: उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला.
Shiv Sena Shinde Group: विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सर्व जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीत प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले जात आहे. यातच आता केवळ लक्ष्मी दर्शनामुळेच जयंत पाटील यांना मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाची जनतेतील क्रेझ संपली आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे.
शेकाप पक्षाचा अंत आता जवळ आला आहे. शेकापची जनमानसात असलेली क्रेझ आता संपलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा बळी जाणार हे आधीच सांगितले होते. त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही जनाधार नव्हता. गेल्या १५ वर्षांत जयंत पाटील यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. परंतु, शरद पवार गटाची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचे राजकारण आधी नव्हते. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचे. आधीही निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असे घडत असेल तर जनतेने दोन्ही सभागृहे कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.