Maharashtra Politics: “अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:33 AM2023-03-29T09:33:29+5:302023-03-29T09:34:14+5:30
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Maharashtra Politics: मंत्री, नेते मंडळी आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत येत असतात. त्यातून मोठा गदारोळही होत असतो. राज्याच्या राजकारण गेल्या काही महिन्यांपासून हाच अनुभव येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांची भर पडली आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना, अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही. मात्र, आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. (Tanaji Sawant Controversial Statement)
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक मोठे विधान केले आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूरचे पालकमंत्री केले तर किती अनुदान मिळते, हे दाखवून दिले असते
वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरु झाला. मात्र आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वांत आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्याने उपस्थितीतांमध्ये अस्वस्थता सुरु झाली, असे सांगितले जात आहे. यानंतर आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो. मला सोलापूरचे पालकमंत्री केले तर किती अनुदान मिळते, हे दाखवून दिले असते, असे सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. तानाजी सावंत यांच्या विधानाचे मोठे पडसाद उमटू शकतात, अशीही चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"