“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:29 PM2023-04-25T14:29:29+5:302023-04-25T14:30:24+5:30

Ratnagiri Barsu Refinery: रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरी सर्वेक्षणासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका स्पष्ट केली.

shiv sena shinde group minister uday samant reaction over ratnagiri barsu refinery survey row | “बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

“बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले अन् आता विरोध”; उदय सामंत स्पष्टच बोलले!

googlenewsNext

Ratnagiri Barsu Refinery: बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिले होते आणि आता तेच विरोध करत आहे हा दुटप्पीपणा असल्याची टीका उदय सामंत यांनी केली. 

आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसू येथील घटनास्थळावरील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. हे सर्वेक्षण नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीच माहिती नसल्याने हा तणाव आणखी काही दिवस राहणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. 

बारसू रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनीच पत्र दिले 

सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. नाणार प्रकल्प रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की, रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली. 

बारसू प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकाने जागा निश्चित केली

बारसू येथे प्रकल्प होऊ शकेल की नाही, यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. यानंतर तेथे प्रकल्प होण्याबाबत निर्णय केला जाणार आहे. शरद पवार यांनीही याबाबत माहिती घेतली आहे. तसेच बारसूची जागा महाविकास आघाडीचे सरकार असताना निश्चित करण्यात आली होती. सर्वेक्षणाला अनेकांचा पाठिंबा आहे. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला देण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत बैठक झाली आहे. ज्याला मला भेटायचे आहे, त्यांना मी भेटेन, असे उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, बहुतांश लोकांना ताब्यात घेतल्यानंतर अत्यंत कमी आंदोलक बारसूच्या माळरानावर होते. झाडाच्या सावलीचा आधार घेत ते तेथेच बसून आहेत. मात्र वातावरण निवळले असल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचे साहित्य घेतलेला कंटेनर सकाळीच पोलिसांच्या ताफ्यातून सर्वेक्षणस्थळी दाखल झाला आहे. बोअरवेलप्रमाणे खोदकाम केले जाणार असल्याने त्यासाठीची यंत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. या कामाला नेमके किती दिवस लागणार आहेत, याची माहिती अजून कोणीही दिलेली नाही. मात्र ३१ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू ठेवण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: shiv sena shinde group minister uday samant reaction over ratnagiri barsu refinery survey row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.