“छत्रपती शिवरायांच्या काळात न्याय मिळायचा तसा न्याय देणार”; योगेश कदम देशमुख कुटुंबाला भेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:43 IST2025-04-04T14:41:33+5:302025-04-04T14:43:33+5:30
Minister Yogesh Kadam Meet Santosh Deshmukh Family In Beed: संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी आग्रही असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले आहे.

“छत्रपती शिवरायांच्या काळात न्याय मिळायचा तसा न्याय देणार”; योगेश कदम देशमुख कुटुंबाला भेटले
Minister Yogesh Kadam Meet Santosh Deshmukh Family In Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सध्या बीड जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. मात्र तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित करत मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली. बीड प्रकरणावरून अद्यापही राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट बीड गाठत संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली.
बीड सरपंच हत्या: धनंजय देशमुखांनी दिलं अजित पवारांना पत्र, काय मागणी केली?
बीड मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांस सांत्वनपर भेट दिली. जे काही त्यांच्या कुटुंबियांना दु:ख भोगावे लागले ते दुर्दैवी आहे. या कठीण काळात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी आग्रही असल्याचा विश्वास त्यांना दिला. संतोष देशमुखांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती. ज्या नराधमांनी हे कृत्य केले, त्यांना कायद्याने शिक्षा ही होणारच. या हत्या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही. प्रशासन या प्रकरणी अधिक चौकशी करत असून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अन्य काही गुन्हेगार यात सामील असतील तर त्यांच्या देखील मुसक्या आवळल्या जातील. शिवाजी महाराजांच्या काळात जसा न्याय मिळायचा तसा न्याय आम्ही देणार..!, असे योगेश कदम यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार
या प्रकरणाच्या वेळी कार्यरत असलेले सर्वच अंमलदार, हवालदार यांची बदली करण्याचे आदेश दिले. तसेच मी कोणाचीही गय करणार नाही. महाराष्ट्रात असले चाळे चालणार नाहीत, सरळ बडतर्फ केले जाईल, अशी सक्त ताकीद स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली. तसेच आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचे नाही. कोणीही असेल तर कारवाई करा अशा सूचना केल्या. बीडच्या जेल मधील व्हीआयपी ट्रीटमेंट आणि वाल्मीक कराड गँगच्या इतर कारागृहातील स्थलांतराबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती योगेश कदम यांनी यावेळी दिली.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि मकोका अंतर्गत ज्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत ते आरोपी बीड कारागृहात आहेत. या कारागृहात नुकतीच काय घटना घडली, हे आपण पाहिलं. या प्रकरणानंतर ज्या घटना झाल्यात त्यातील आरोपींना नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी हलवण्यात येत आहे. पण हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपींना बीड कारागृहात कशामुळे ठेवले आहे? याबाबत आम्ही विचारणा केली असून त्याचे उत्तर आम्हाला मिळणे अपेक्षित आहे, असे धनंजय देशमुख यांनी यापूर्वी म्हटले.