“मनसेचा महायुतीत समावेश करायला पाहिजे, फायदाच होईल”; शिंदे गटातील नेत्याचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:07 PM2024-02-13T21:07:27+5:302024-02-13T21:08:35+5:30
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: मनसे पक्ष सोबत आला तर स्वागत होईल. राज ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाचा पराभव करण्याचा हेतू समोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीत मोठी बिघाडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेला भाजपा प्रवेश काँग्रेस पक्षासह राज्यातील महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचा महायुतीत समावेश करायला हवा, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशासह मनसेचा महायुतीत समावेश करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. आम्ही अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत करत आहोत. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते महायुती आणि एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धोरणे, नीती आखली जात आहे. याच विचाराने अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
मनसेचा महायुतीत समावेश करायला पाहिजे, अशीच भूमिका
मनसेचा महायुतीत समावेश करावा, अशी सर्वांचीच भूमिका आहे. कारण आम्ही ज्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे, त्याच विचारांवर मनसेची कार्यप्रणाली आधारित आहे. अशावेळेस समान विचार असणारे पक्ष एकत्र आले तर त्याचा फायदा होईल. मनसे पक्ष सोबत आला तर स्वागत होईल. राज ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, आमच्या दृष्टिकोनातून आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. ती निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. प्रत्येक पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे एनडीएला ४०० पार जागा कशा मिळतील, याचा विचार करून प्लॅनिंग करण्यात आले आहे. व्यक्तिगत पक्षाचा स्वार्थ बाजूला ठेवत आहोत. महायुतीच्या माध्यमातून एनडीएचे सरकार कसे येईल, त्या दिशेने आम्ही सर्व कार्यरत आहोत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.