व्हीपचे उल्लंघन भोवले! ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई होणार? शिंदे गटाकडून प्रक्रिया सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:36 PM2023-08-11T15:36:19+5:302023-08-11T15:37:13+5:30
लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता.
Parliament Monsoon Session 2023: विरोधकांकडून सत्ताधारी केंद्र सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव आणण्यात आला होता. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. मात्र, यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचा दावा करत शिवसेना शिंदे गटाकडून आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती दिली.
लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप पाठवला होता. मात्र ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.
लोकसभेत शिवसेनेचा एकच गट
वकिलांशी चर्चा करून ठाकरे गटाच्या खासदारांना कायदेशीर नोटीस देणार आहोत. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट मानला जातो. त्यामुळे व्हीप भावना गवळी यांचाच लागू होतो, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी वॉक आऊट केले. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
दरम्यान, शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.