“उद्धवसाहेब, मरेपर्यंत तुमच्यासोबतच राहणार”; वाढदिवसानिमित्त ठाकरेंना शिलेदाराचा शब्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:16 PM2023-07-26T20:16:58+5:302023-07-26T20:17:51+5:30
Shiv Sena Thackeray Group: त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आम्ही सगळे वाघ आहोत आणि ते सगळे खेकडे आहेत, अशी टीका शिंदे गटावर करण्यात आली आहे.
Shiv Sena Thackeray Group: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असला तरी, दुसरीकडे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. यातच आता वाढदिवसानिमित्ताने एका कट्टर, विश्वासू शिलेदाराने उद्धव ठाकरेंना कायम सोबत राहणार असल्याचा शब्द दिला आहे.
ठाकरेंचे विश्वासू शिलेदार राजन साळवी यांनी वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना कायम सोबत राहण्याचा शब्द दिला आहे. आम्ही सगळे निष्ठावान शिवसैनिक त्यांच्यासोबत आहोत, असे राजन साळवी म्हणाले आहेत. आम्ही सगळेजण उद्धवजींसोबत आहोत आणि मरेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. यामध्ये कुठल्याही दुमत नाही. जे सोडून गेले ते गद्दार होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, अशी टीकाही राजन साळवी यांनी केली.
आम्ही सगळे वाघ आहोत आणि ते सगळे खेकडे आहेत
आम्ही सगळे वाघ आहोत आणि ते सगळे खेकडे आहेत, असे मी स्पष्ट सांगतो. कारण ज्यांच्या मतावर ज्यांच्या विचारावरती निवडून आले त्या पक्षाला हे लोक सोडून गेले आणि सत्तेमध्ये जाऊन बसले, जनता यांना माफ करणार नाही, या शब्दांत राजन साळवी यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनीही ठाकरे गटावर हल्लाबोल केला. पोटात पोटशूळ उठणे साहजिक आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेले विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवले आहेत. भाजपची टिवटिव मुलाखतीमुळे सुरू झाली आहे. गद्दारांची पिलावळ आता वळवळायला लागली आहे, असा निशाणा राऊत यांनी साधला.
दरम्यान, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, तो शासन पुरस्कृत आहे. मणिपूरमध्ये मानवी हत्यांचे सत्र सुरू आहे. यावर लोकसभेत चर्चा व्हावी आणि त्यावर पंतप्रधान यांनी बोलावे ही आमची मागणी आहे. पंतप्रधान बोलत नाहीत. म्हणून आम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडावा लागला आहे. बहुमत भाजपकडे आहे. त्यामुळे प्रस्ताव फेटाळला जाईल हे आम्हाला माहिती आहे. पण आमच्या हाती असलेल्या आयुधाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान यांना सभागृहात यावेच लागेल, असा निर्धार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.