“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 18:10 IST2025-04-20T18:08:33+5:302025-04-20T18:10:56+5:30
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे सोबत येणार असतील, तर त्यांचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असावा, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.

“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील, तर निश्चित मराठी माणसाचे हित त्यात आहे. ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, असे माझे प्रामाणिक मत आहे आणि ते कालही होते आणि आजही आहे. मी आणि बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकत्र येण्यासाठी हात पुढे केले. परंतु, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्याला मान्यता दिली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिली.
राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच रामदास कदम यांनी यावर भाष्य केले आहे.
राज ठाकरेंचा आधार घेऊन राजकारणात तरण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला तेव्हा सांगितले होते. केवळ पुणे आणि नाशिक जिल्हा मला द्यावा आणि बाकी उद्धव ठाकरेंनी सांभाळावे, एवढीच मागणी राज ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातातून सगळेच गेले आहे. आकाश फाटले आहे. त्यामुळे ठिगळे कुठे-कुठे लावणार. मग राज ठाकरे येत असतील, तर त्यांचा आधार घेऊन आपल्याला राजकारणात थोडे डोके वर काढता येऊ शकेल का, हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असावा, असा दावा रामदास कदम यांनी केला.
तेव्हा राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेना फुटली नसती
मी दोघांचे काम पाहिले आहे. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत. आतल्या गाठीचे नाहीत. परंतु, उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. आता अटी आणि शर्थी घालायला प्रश्न कुठे येतो, तुम्ही भाऊ आहात ना. त्यावेळेस आमच्याकडून चूक झाली. महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला हवे होते. शिवसेनेकडून ही झालेली मोठी चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते, तर शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे यांच्याकडे माणसे ओळखण्याची किमया आहे. राज ठाकरे वाघासारखा माणूस आहे. त्यांना वाघासारखी माणसे लागतात. उद्धव ठाकरेंना सुभाष देसाई यांच्यासारखी माणसे लागतात. शेळ्या मेंढ्या. दोन्ही भाऊ एकत्र आले, तर चांगले आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, तर राज ठाकरे येतील असे वाटत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना राज ठाकरे काळिमा फासणार नाही. राज ठाकरे स्वाभिमानी माणूस आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर महाराष्ट्र आज राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना पाहात आहे. हे वास्तव आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. राज ठाकरे यांना टाळी देणार असतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडणार का, हे उद्धव ठाकरेंना तुम्ही विचारा. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.