उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:45 IST2024-04-29T18:44:49+5:302024-04-29T18:45:38+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात. राम मंदिर बनले याचे यांना समाधान नाही, अशी टीका करण्यात आली.

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहेत. प्रचारसभांतून केलेल्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना यासंदर्भात मोठे खुलासे करणारी विधाने केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लावणे हा राजकारणाचा एक भाग होता. उद्धव ठाकरे यांना भावनिक करून राजीनामा द्यायला लावायचा. भाजपसोबत जायचे, असा डावा शरद पवार यांचा होता. सर्व राजकारण शरद पवार यांनी केले. त्यांना संजय राऊत यांचा पाठिंबा होता, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला.
सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात
संजय राऊत हा कुणाचा माणूस विचारले तर ते शरद पवार यांचा माणूस आहे असे म्हणणार. देवेंद्र फडणवीस हा नेता यांना भारी पडला म्हणून यांची पोटदुखी आहे. सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात. राम मंदिर बनले याचे यांना समाधान नाही. यांचे दुःख आहे की, जमिनीचे व्यवहार झाले असतील, आम्हाला न विचारता कसे झाले? असे त्यांना वाटत असेल. गर्व से कहो हम हिंदू है, ही बाळासाहेबांची गर्जना विसरले. मुंबई तोडण्याची भाषा यांना निवडणूक आल्यावरच समजते. चुकीच्या गोष्टी बिंबवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिल्याने विरोधक टीका करत आहेत. मोदी सहा सभा घेत आहेत, याचा आनंद माना. मोदी सभा घेतात याचा अर्थ महाराष्ट्राचे महत्त्व वाढले आहे. आरक्षणाबाबत हेच सरकार चांगला निर्णय घेऊ शकतात, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.