शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:46 PM2024-05-26T15:46:37+5:302024-05-26T15:47:58+5:30
Sanjay Shirsat News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. आमच्या शिवसेनेतही इन्कमिंग होणार आहे. योग्यवेळी निर्णय होईल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Sanjay Shirsat News: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग सुरू होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर आले आहे. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे वृत्त सर्व प्रमुख माध्यमांनी दिले आहे. सोमवारी या दोघांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीमधील इन्कमिंगबाबत थेट शब्दांत भाष्य केले आहे.
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले
आता आगामी काही काळात अजित पवार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे. अजितदादांकडेही अनेकजण येणार आहेत. कारण, आता शरद पवार गटाला आमदार कंटाळले आहेत. त्या गटात चाललेली हुकूमशाही, मीपणा आणि अहंभाव याला आमदार कंटाळले आहे. ते आता अजित दादांच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, ६ जूननंतर आमच्या शिवसेनेतही इनकमिंग सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. माझ्याही संपर्कात आहेत. आमच्यामध्ये नियमित चर्चाही होते आहे. योग्यवेळेला योग्य निर्णय घेण्याची एकनाथ शिंदे यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील, असेही संजय शिरसाट म्हणाले.