“ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:02 AM2024-03-29T11:02:54+5:302024-03-29T11:03:23+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गट आणि काँग्रेसने भांडायचे आणि शरद पवार दुरून मजा बघणार, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena Shinde Group News: जागावाटपाची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या काही जागांबाबत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शरद पवार यांनीही महाविकास आघाडीत घडत असलेल्या प्रकारावरून खडेबोल सुनावले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात चर्चा सुरू होती. या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे नेते सातत्याने सांगत होते. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले
शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये भांडण लावले. ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकला आहे. ज्या सांगलीत ठाकरे गटाच्या पक्षाचे अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल. मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाचे सांगलीवर प्रेम नाही. ज्याला सांगलीतून उमेदवारी दिली आहे तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही ठाकरे गटाचा कार्यकर्ता नाही. ज्याच्यासाठी ठाकरे गट आग्रही भूमिका मांडतोय तो चंद्रहार पाटील शिवसैनिकही नाही. खरेतर ही शरद पवारांनी खेळलेली खेळी आहे. त्या खेळीत ठाकरे गट फसला. ठाकरे गट आणि काँग्रेसने भांडायचे आणि शरद पवार दुरून मजा बघणार, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.