जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:27 PM2024-06-01T15:27:04+5:302024-06-01T15:29:52+5:30
Shiv Sena Shinde Group News: सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान होत असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याविषयी इंडिया आघाडी आणि एनडीए दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच ०४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली.
१० जून रोजी अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याचबरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत. ०४ जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळही मागितली आहे. त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे. ४ जूननंतर शरद पवार गट रिकामा होणार आहे, असा मोठा दावा अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली आहे.
रोहित पवारांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय पक्षाबाहेर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अनेक उलथापालथी होणार आहेत. ज्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबरोबर काम केले. त्यांना आता रोहित पवारांचे ऐकावे लागत आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत. रोहित पवारांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय पक्षाबाहेर आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाकरे गटाची जी गत झाली, तीच आता शरद पवार गटाची होताना दिसत आहे, या शब्दांत संजय शिरसाट यांनी निशाणा साधला.
दरम्यान, जयंत पाटील यापूर्वीच भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील, असे चित्र होते. सूरज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य आहे. शरद पवार गटाचे राजकीय भविष्य जयंत पाटील यांना चांगले माहिती आहे, त्यामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.