“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:24 PM2023-08-08T17:24:11+5:302023-08-08T17:25:42+5:30

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: तेव्हा शिवसेना-मनसे युतीबद्दल बोलायचो. पण उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली.

shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray alliance | “राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

googlenewsNext

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत. ज्या ध्वनिफिती नाहीत, त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिंदे गटाने प्रतिक्रिया देताना आम्ही मागेच उद्धव ठाकरेंनाराज ठाकरेंशी बोलणी करून युती करूया, असे सांगत होतो, असे म्हटले आहे. 

आजची परिस्थिती कशीही असो, राज ठाकरे गेल्या १४ वर्षांपासून त्यांचा पक्ष चालवत आहेत. त्यांच्या ताकदीने ते पक्ष चालवत आहेत. त्यांनाही बराच त्रास दिला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही, प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही. राज ठाकरे त्यांना झालेला त्रास विसरणार नाहीत, असे सांगताना, अशा अनेक कारणांमुळे ठाकरे गट आणि मनसेची युती होईल, असे वाटत नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो

आम्ही २०१४ ला मनसेसोबत युती करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, तेव्हा ते आम्हाला म्हणाले, का बोलायचे? कशासाठी बोलायचे? ज्यांना तिकडे जायचे, ते जाऊ शकतात. दोन्ही भाऊ एकत्र येणे आनंदाची गोष्ट आहे. परंतु स्वतःचे काही द्यायचं नाही, ही जी त्यांची वृत्ती आहे, त्यामुळे दोन पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. ते खूप दिलदार आहेत. ते एखाद्या वेळी असा निर्णय घेऊ शकतात. परंतु, यांच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूचे बगलबच्चे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, असे सांगत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली. 

दरम्यान, आम्ही स्वतः शिवसेना मनसे युतीबद्दल बोलायचो. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजप युती नव्हती, तेव्हा आम्ही बोललो होतो. आपली भाजपबरोबर युती होत नाही ना, मग आपण राज ठाकरे यांच्याशी बोलायला हवे. पण नाही, ते म्हणाले, का बोलायचे? कशासाठी बोलायचे? ज्यांना तिकडे जायचे आहे ते जाऊ शकतात. हे त्यांचे ठरलेले वाक्य आहे. त्यामुळे कधी जवळीक निर्माण झाली नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.


 

Web Title: shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.