ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:36 IST2025-04-19T14:35:34+5:302025-04-19T14:36:23+5:30

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum | ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा राजकीय युतीसाठी हात पुढे केलेला हात आणि उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. 

कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. शिवसेनेत असताना मला उद्धवसोबत काम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो कधी मध्ये आणत नाही, आणला पण नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या आवाहनावर उद्धव ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी आवाहन केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मीही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं मीदेखील आवाहन करत आहे. पण आमची फक्त एक अट आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही, हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातील भांडणे, जी कधी नव्हती, तीही आजपासून मिटवून टाकली चला. महाराष्ट्राच्या हितासाठी मग सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की, भाजपासोबत जायचे की माझ्या शिवसेनेसोबत यायचे. पण आधी ठरवा की, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचे, मराठी आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे. हे आधी ठरवा आणि मग जो काही पाठिंबा द्यायचा असेल, विरोध करायचा असेल तो बिनशर्त द्या, माझी काही हरकत नाही. फक्त एकदा सोबत आल्यानंतर समोर जे चोर आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या, अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे. 

उद्धव ठाकरे यांचा इगो, त्यामुळे हे कुटुंब विभक्त झाले

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे हे कुटुंब विभक्त झाले आहे. राज ठाकरे यांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता आणि त्यांनी तशी भाषा ही कधी केली नव्हती. भविष्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही. त्यांचे विचार वेगळे आहेत. उद्धव ठाकरेंना आता शरद पवार काँग्रेस बाकी इतर काही घटक पक्ष त्यांच्यासोबत जाण्यास स्वारस्य आहे. उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणे उचित वाटत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केले मला माहिती नाही. ते दोघे भाऊ आहेत. ते एकत्रित येणार असेल तर आमचे काही म्हणणे नाही. महाराष्ट्र हितासाठी आम्ही सोबत होतो. शिवसेना कोणी हॅन्डल करायची हा त्या दोघा भावांचा विषय आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.