“संजय राऊत लोकसभा लढवणार असले तर आम्हाला आनंदच, कारण...”; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:39 PM2023-08-21T14:39:13+5:302023-08-21T14:40:22+5:30
Sanjay Shirsat Vs Sanjay Raut: संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
Sanjay Shirsat Vs Sanjay Raut: संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असे सांगितले जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. यावर संजय राऊतांनी सूचक शब्दांत भाष्य केले आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पक्षादेशाचे पालन करेन. पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज व पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी मी आहे. मला विचारले ईशान्य मुंबईतून तुम्ही निवडणूक लढवणार का. मी म्हटले पक्षाने आदेश दिला तर मी काहीही करीन. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी निवडणुकीला उभा राहिला, तरी तो दोन ते सव्वादोन लाख मतांनी निवडून येईल, अशी स्थिती आहे. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
संजय राऊत लोकसभा लढवणार असले तर आम्हाला आनंदच, कारण...
संजय राऊत वेडा माणूस आहे, सकाळी काहीही मुद्दे घेत असतात. संजय राऊत निवडणूक लढवणार असतील, तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एकदा त्यांना त्यांची औकात कळू द्या. संजय राऊतांचे डिपॉझिट जाऊ नये म्हणजे झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
दरम्यान, राज्यामधील जनतेने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य योग्य आहे. राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही झाला नाही. जेव्हा होण्याची वेळ आली. तेव्हा ते दुसऱ्या पक्षाला दिले, शरद पवार यांची महाराष्ट्रात ताकद असली तरी सत्ता हाती आली नाही. हेही तितकेच सत्य आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.