“मिलिंद नार्वेकरांनी सावध राहावे, लक्ष ठेवा”; विधान परिषद निवडणुकीवरुन शिंदे गटाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:16 PM2024-07-10T15:16:28+5:302024-07-10T15:16:42+5:30
Shinde Group Sanjay Shirsat News: विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘मॅजिक पॅटर्न’ पाहायला मिळेल, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Shinde Group Sanjay Shirsat News: विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीने उमेदवार मागे न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी ही निवडणूक होणार असून, कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यात ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली. यावरून शिंदे गटातील नेत्यांनी एक सल्ला दिला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरेशी मते नसताना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. विधान परिषदेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी २३ आमदारांची मते आवश्यक आहेत. पण ठाकरे गटाकडे सध्या १५ आमदार आहेत. त्यामुळे इतर मते ठाकरे गट कसे मिळवणार? हा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यासंदर्भात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी एक सल्ला दिला आहे.
मिलिंद नार्वेकरांनी सावध राहावे, लक्ष ठेवा
मिलिंद नार्वेकर आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते निवडून यावे, अशी आमची इच्छा आहे. असे असले तरी त्यांना सांगेन की, तुमचा कोणी बळी देत आहे की काय? याकडे लक्ष ठेवा. अन्यथा मिलिंद नार्वेकर हे अधिक वरचढ ठरत आहेत, म्हणून बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न कोणी करत आहे का? यापासून त्यांनी सावध राहिले पाहिजे. लक्ष ठेवा, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देण्यात आली आहे. पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मत कशी द्यायची? यासंदर्भात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत बोलताना, हे एक टीम वर्क आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. या टीम वर्कमध्ये ते काम करत आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘मॅजिक पॅटर्न’ पाहायला मिळेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.