“बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही, पण...”; शिंदे गटाने ठेवली एकच अट?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:24 AM2024-03-25T10:24:01+5:302024-03-25T10:24:25+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: विजय शिवतारे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेत बारामतीतून लोकसभा लढविण्याच्या निर्णयावर विजय शिवतारे ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूजत काढूनही विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. १२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका विजय शिवतारेंनी जाहीर केली. यावरून आता विजय शिवतारे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.
महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा नेत्रा पवार यांनी लोकसभेसाठी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, पण...
विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की, कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही अडवू शकत नाही. जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. एखाद्याने पक्ष सोडला असेल तर तो स्वतंत्र आहे. परंतु, पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल. ज्यांना हा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावे. त्यांना आमचा पाठिंबा नसेल. विजय शिवतारे यांना बारामतीमधून लढायचे असेल तर त्याच्याशी आमचा संबंध नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी”, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग विजय शिवतारेंना लागू पडतो. जसे विंचवाच्या अंगी विष असते तसे विजय शिवतारे हे विषारी प्रवृत्तीचे आहेत. विजय शिवतारे हे बालिश विधाने करत आहेत. दिवा विझण्यापूर्वी जसा फडफडतो, तसा विजय शिवतारे यांचा राजकीय अंत जवळ आल्याचे दिसते, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला.