“काँग्रेसला कोणीही वाली नाही, ठाकरे गटातील नेतेही पक्ष सोडतील”; शिंदे गटातील नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:46 PM2024-02-14T20:46:29+5:302024-02-14T20:49:40+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अवघ्या दोन तीन दिवसांत याचा खुलासा होईल, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून काही दिवसांच्या अवधीत बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण बाहेर पडले. यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटानेही काँग्रेसमधून पक्षात आलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटातून आणखी अनेक नेते बाहेर पडतील, असा दावा केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सूक आहेत, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच अशोक चव्हाण भाजपात जाणार आहेत, हे आम्हाला अगोदरच माहिती होते. आम्ही मरेपर्यंत काँग्रेससोबतच राहणार, असे जे शपथेवर सांगत आहेत ना, त्यांनी मरेपर्यंत नव्हे तर लोकसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी काँग्रेसमध्ये राहावे, असा खोचक टोला लगावताना, आगामी १५ दिवसांत काँग्रेसमधील अनेक नेते भाजपात जाताना दिसतील. काँग्रेस पक्ष कधीही फुटू शकतो. त्यांना कोणीही वाली नाही, या शब्दांत संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले.
ठाकरे गटाचे काही नेते, आमदार आमच्या संपर्कात
अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे काही नेते आणि आमदार आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. हे नेते कोण आहेत, ते आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र यामध्ये काही नेते आणि आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचा खुलासा अवघ्या दोन तीन दिवसांत होईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी यादी जाहीर केली असून, राजस्थान येथून सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.