“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:27 IST2025-02-20T14:25:38+5:302025-02-20T14:27:30+5:30
Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटात थांबण्यात काही अर्थ नाही, अशी अनेकांची भावना झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका
Shiv Sena Shinde Group News: उद्धवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची चर्चा थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत.
आम्ही गुहाटीला गेलो, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले. त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत, हेच महाराष्ट्राला दाखवून दिले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे, हे राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यात ठाकरे गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही. टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळे भविष्यात ते एकाकी पडतील, असे शहाजीबापू पाटील म्हणाले होते. यानंतर आता शहाजीबापू पाटील यांनी सदर दावा केला आहे.
एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील
प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, चौकशी लावली म्हणून कोणी पक्षात येत नाही आणि कुणी पक्ष सोडून जात नाही. छगन भुजबळ यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी पक्ष सोडला का, संजय राऊतांवर चौकशी सुरू आहे, त्यांनी पक्ष सोडला का, अशी विचारणा करत, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तविक परिस्थिती अशी झाली आहे की, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी अनेकांची भावना झाली आहे आणि ही भावना इथपर्यंत झाली आहे की, एक दिवस असा येईल की, आदित्य ठाकरेच वडील उद्धव ठाकरे यांना सोडण्याची भाषा करतील, या शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी खोचक टीका केली.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काही जण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काही नेते, पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, वाढत चाललेले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत. ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर आठवड्याला आढावा बैठक होऊ शकते. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.