“अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती”; शहाजी बापू पाटलांची छगन भुजबळांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 06:06 PM2023-12-14T18:06:44+5:302023-12-14T18:07:17+5:30
Shahaji Bapu Patil Vs Chhagan Bhujbal: आपल्यावर अन्याय होणार आहे असे गृहीत धरून तुम्ही मेळावे का घेताय, अशी विचारणा शहाजी बापू पाटील यांनी केली.
Shahaji Bapu Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ नवनवीन गौप्यस्फोट करत मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असून, मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर पलटवार करत आहेत. यातच आता अन्य पक्षातील नेतेही आरोप-पत्यारोप करताना दिसत असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सभागृहात झाली. या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी घाबरण्याचे कारण नाही. तुमच्यावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या. अजून तुमच्यावर अन्यायच झालेला नाही. आपल्यावर अन्याय होणार आहे असे गृहीत धरून तुम्ही मेळावे का घेताय, अशी विचारणा करत, छगन भुजबळ यांचे प्रतिमेळावे घेण्याचे धोरण चुकीचे वाटते, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.
अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मेळावे घेतले म्हणून छगन भुजबळांनी तसेच मेळावे घेणे हे चुकीचे आहे. अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती. छगन भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेटमधील मंत्री आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी मंत्रिमंडळाचे व्यासपीठ उपलब्ध होते. परंतु, त्यांनी समाजात जाऊन प्रतिमेळावे घेणे चुकीचे आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. या मागणीचा मी कडवा समर्थक आहे. मराठा समाजातील तरुणांची आरक्षणासाठीची तीव्रता वाढत चालली आहे. याचा उद्रेक होण्याअगोदर आरक्षणाचा निर्णय होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.