Maharashtra Politics: “आता मी अमिताभ बच्चनसारखा चालतो”; शहाजीबापूंनी सांगितलं वजन कमी करण्यामागचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:58 PM2023-03-16T13:58:40+5:302023-03-16T13:59:20+5:30
Maharashtra Politics: मुका घ्या मुका, या शेरेबाजीची किंमत संजय राऊतांना चुकवावी लागेल, असा इशारा शहाजीबापू पाटील यांनी दिला.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून अभूतपूर्व बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० आमदार गुवाहाटीला गेले. यातच काय डोंगर, काय झाडी, काय हाटील या डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी अलीकडेच वजन कमी केले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य शिबिरात सहभागी होत शहाजी बापू पाटील यांनी वजन कमी करण्यामागचे रहस्य सांगितले.
शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेले होते. या ठिकाणी ते १२ दिवस राहिले. या १२ दिवसात त्यांनी त्यांचं वजन कमी केले. आपले वजन कसं कमी केले, याबाबत शहाजी बापू पाटील यांनी मनमोकळेपणाने सांगितले. वय आणि वजन यांमुळे चालता येत नव्हते. एसटीत चढता येत नव्हते. घरचा जीना चढताना मला त्रास व्हायचा. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाला दांडी मारून बंगळुरूला गेलो. आणि सटासट १२ किलो वजन कमी करूनच माघारी आलो. आता मी अमिताभ बच्चनसारखा चालतो. बायकोपण म्हणाली बंगळुरूला जाऊन एवढे कमी केले. मी स्वत:वर प्रेम करून आयुर्वेदीक काढा पिऊन पिऊन चरबी सगळी काढून टाकली आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात थांबलो
नागपूर अधिवेशन सुरू असतानाच एक दिवस विचार केला. शरीराचे काय करायचे? उपचार करायला हवे असे ठरवले. अधिवेशनाला आठ दिवस उरलेले असतानाच बंगळुरूला गेलो. श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात थांबलो. १२ दिवस मी मसाज केला. वनस्पतींचे काढे घेतले. रात्रभर काढा पिऊन सटासट १२ किलो वजन कमी केले, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणात मुका घ्या मुका अशी शेरेबाजी करून संजय राऊत यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. राऊत यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो. त्याची किंमत संजय राऊत यांना चुकवावी लागेल, असा इशारा शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"