“सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:37 AM2024-04-02T10:37:40+5:302024-04-02T10:38:14+5:30

Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. पण ठाम आहेत. ते भाजपासमोर झुकणार नाहीत, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

shiv sena shinde group suresh navale criticises bjp over lok sabha election 2024 | “सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका

“सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका

Shiv Sena Shinde Group News: महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्रीचा दिवस करून चर्चा सुरू आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही महायुतीमधील नेत्यांची ये-जा सुरू असल्याचे दिसत आहे. यातच शिंदे गटातील नेते आणि एका माजी मंत्र्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात खलबते सुरू आहेत. तर काही जागांवर उमेदवार बदलावेत, असा दबाव भाजपाकडून शिवसेना शिंदे गटावर असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून शिंदे गटातील सुरेश नवले यांनी भाजपावर टीका करत चांगलेच सुनावले आहे. तसेच काही आरोप अन् दावे केले आहेत.

सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे आणि फसवण्याचे काम सुरू

जे नको आहेत, ते लोक बदलले पाहिजेत, असा आग्रह भाजपाचा आहे. यासाठी वारंवार सर्व्हेची कारणे दिली जात आहेत. आयव्हीचा रिपोर्ट विरोधात आहे, आम्ही जो रिपोर्ट दिला आहे तो विरोधात आहे. सर्व्हे विरोधात असल्यामुळे तुम्ही उमेदवार बदला ही भाजपची रणनिती चुकीची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. परंतु, ते ठाम आहेत, हा विश्वास आम्हाला आहे. भाजपाच्या एकूण षड्यंत्राला ते बळी पडणार नाहीत. पण, अशा प्रकारचे चित्र भाजपाकडून उभे केलं जात आहे. बाहेर चर्चा सुरू आहेत. आणि ही चर्चा महायुतीसाठी घातक आहे, असे नवले यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, भाजपा मित्रपक्षांना संपवत आहे. भाजपा सर्व्हेच्या नावाखाली एकनाथ शिंदेंना फसवण्याचे काम करत आहे. परंतु, एकनाथ शिंदे भाजपासमोर झुकणार नाहीत, असे नवले म्हणाले. राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांच्या महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: shiv sena shinde group suresh navale criticises bjp over lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.