“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 01:30 PM2024-07-17T13:30:40+5:302024-07-17T13:31:12+5:30
Uday Samant News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
Uday Samant News: अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरून अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी जयंत पाटील यांच्या पराभवावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, जयंत पाटील यांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने आहे. कोणी कोणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील यांना मत फुटणार असे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले, असा आरोप उदय सामंत यांनी केला.
महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार परत येईल
आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सातत्याने महायुती सरकार कोसळेल, पुढील विधानसभेला पुन्हा महायुतीचे सरकार येणार नाही, असे दावे करताना दिसत आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, अडीच वर्षापासून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल, असे म्हणत होते. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा येईल. सरकारला काही होणार नाही, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाकरे गट हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर आघाडी आणि युती करावी, तसेच २८८ जागा लढवाव्या की, फक्त ८८ जागा लढवाव्यात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. २८८ मतदारसंघाचा ते आढावा घेणार असतील तर कदाचित स्वबळावर निवडणूक लढण्याचे त्यांच्या मनात असेल. त्यामुळे ते अशी चाचपणी करत असतील. मग चाचपणी केल्यानंतर २८८ उमेदवार त्यांच्याकडे आहेत की नाही हे त्यांना समजेल, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.