Vijay Shivtare: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून बाहेर पडेन”; विजय शिवतारेंचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:27 AM2024-03-23T11:27:07+5:302024-03-23T11:27:16+5:30
Vijay Shivtare On Baramati: जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात लोकांना चांगले पर्याय लोकशाहीत मिळतील, तेव्हा तेव्हा नक्कीच चमत्कार होईल, असा ठाम विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
Vijay Shivtare On Baramati: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. यातच उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी पवारांविरोधात दंड थोपटले असून, निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. यातच आता प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडेन, असे मोठे विधान विजय शिवतारे यांनी केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात भूमिका घेतली असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेची झोड उठवताना दिसत आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या तणाव असल्याचे बोलले जात आहे. प्रसंगी विजय शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते, अशी शक्यता असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमध्ये विजय शिवतारे यांनी एक मोठे विधान केले आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून बाहेर पडेन
माझे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ नाते आहे. हे दोन-चार महिने त्यांना आता अडचण झालेली आहे. मला तर निवडणूक लढवायची आहे. महायुतीची सीट आपल्याला सुटत नाही. अशा परिस्थितीत त्यांना अडचण आहे, म्हणून मी बाहेर पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची अटॅचमेंट २५ वर्षांपासूनची आहे. ती कायम असणारच आहे, असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले. तसेच माझ्यावर कारवाई होईल, अशा बातम्या सगळीकडे होत्या. त्यामुळे पुढे काय होते, ते पाहू. उगाच कपोलकल्पित गोष्टींवर उत्तर देणे योग्य नाही, असे विजय शिवतारे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीविरोधात माझी लढत होईल. विजय शिवतारे अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे अशीच लढत होईल. हजार टक्के विश्वास आहे की, पहिल्या क्रमांकाची मते मला मिळतील. आज काय झाले आहे की, हाही तसाच आणि तोही तसाच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांना मला उभे राहण्याचा आग्रह केला आहे. एका बाजूला सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार. लोकांची भावना अशी आहे की, आम्हाला या दोघांनाही द्यायचे नाही. त्यामुळे मग तिसरा पर्याय काय आहे, असा सवाल करत, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात लोकांना चांगले पर्याय लोकशाहीत मिळतील, तेव्हा तेव्हा नक्कीच चमत्कार होईल, असा ठाम विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.