"मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:46 PM2024-07-16T17:46:02+5:302024-07-16T17:46:40+5:30

Shiv Sena Shinde Group Uddhav Thackeray : आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात, पण हिंदुत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असेही राजू वाघमारे यांनी सांगितले

Shiv Sena Shinde Leader Raju Waghmare criticizes Uddhav Thackeray for using Shankaracharya for politics by calling on Matoshree  | "मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

"मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

मुंबई - निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. तसेच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री भेटीत पालघर येथील साधु हत्याकांडाबाबत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा डॉ. वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली.  

शंकराचार्य म्हणाले "खरा हिंदू विश्वासघात करीत नाही" तेच वाक्य पकडून डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असेपर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उबाठाने आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बळकावली हा विश्वासघात नव्हता का?  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्याच्या म्हणण्याप्रमाणे  हिंदू कसे असू शकतात? असा सवाल डॉ. राजू वाघमारे यांनी उपस्थित केला. 

लोकसभा निवडणुकीत हिरवे झेंडे फडकवत विशिष्ट समाजाच्या लोकांना सोबत घेऊन देखील उबाठाला स्वत:चा स्ट्राईक रेट राखता आला नव्हता. निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नकली शिवसेनेला असली शिवसेना करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न "उबाठा" ने शंकराचार्यांच्या मदतीने केला अशी टीका राजू वाघमारे यांनी केली. 

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करत आहेत. आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात, पण हिंदुत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे राजू वाघमारे यांनी सांगितले. 

हिंदूत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार हे सांगत राज्यातील कॉँग्रेस नेते नाचत होते. मात्र वारीसाठी, वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊली साठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा आणि तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे अशी टीका ड़ॉ. वाघमारे यांनी केली.

Web Title: Shiv Sena Shinde Leader Raju Waghmare criticizes Uddhav Thackeray for using Shankaracharya for politics by calling on Matoshree 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.