ठाण्यात भाजपावर शिवसेना शिरजोर
By admin | Published: September 18, 2016 02:39 AM2016-09-18T02:39:12+5:302016-09-18T02:39:12+5:30
शिवसेना-भाजपामध्ये नव्या प्रकल्पांच्या घोषणांवरून आणि झालेल्या प्रकल्पांच्या कामांचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून रस्सीखेच सुरू झाली
अजित मांडके,
ठाणे- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपामध्ये नव्या प्रकल्पांच्या घोषणांवरून आणि झालेल्या प्रकल्पांच्या कामांचे श्रेय घेण्याच्या मुद्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच सध्या भाजपामध्ये इनकमिंग वाढू लागल्याने त्याचा धसकादेखील शिवसेनेने घेतला आहे.
दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पालिकेने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. या कामांवरील खर्चाचे नियोजनही या बैठकीत झाले होते. यात तीनहातनाका येथे राबवण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्टेशन, वॉटर फं्रट डेव्हलपमेंट आदी प्रकल्पांवर चर्चा होऊन हे प्रस्ताव मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, या सर्वांचे श्रेय आपल्याला मिळावे, म्हणून शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांना दम भरून या कामांची घोषणा आम्हीच करू, असे सांगितले व तसेच केले. कळवा खाडीपुलावर नवीन उड्डाणपुलाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा पालिका प्रशासन व भाजपाचा प्रयत्न होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्नदेखील हाणून पाडण्यात आला. आता या पुलाचा कोणाच्याही हस्ते शुभारंभ न होता त्याचे काम सुरू झाले आहे.
दिव्यातील आंदोलन चिरडले
शिवसेनेच्या मुजोरीमुळे संतापलेल्या भाजपाने तीन दिवसांपूर्वी दिव्यातील समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे आंदोलन निश्चित केले होते. दिव्यात सध्या शिवसेनेचे प्राबल्य वाढत असल्याने त्याला सुरुंग लावण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र, भाजपा कार्यकर्त्यांना अटक करवून शिवसेनेने हे आंदोलन उधळले.
भाजपातील इनकमिंगने सेना अस्वस्थ शिवसेनेपेक्षा भाजपामध्ये इनकमिंग वाढल्याने शिवसेना अस्वस्थ आहे. शिवसेना इतर पक्षांतील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, गृह खाते भाजपाकडे असल्याने वेगवेगळ्या प्रकरणांत अडकलेले अन्य पक्षांतील नेते भाजपाला जवळ करीत आहेत.
आयुक्तांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडे त्यांच्या घरी पायधूळ झाडली. या वेळी शिवसेनेच्या मुजोरीला कशी वेसण घालायची, याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.