आम्हाला जगू द्या, शिवसैनिकाला मारु नका; शिवसेना नेत्याचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:22 AM2022-01-03T08:22:02+5:302022-01-03T08:23:15+5:30
राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी समोर येत असतात. त्यात आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना(Shivsena) नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) गंभीर आरोप केला आहे.
पुणे – राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेनेत बिनसल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. २०१९ च्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करत भाजपाला विरोधी बाकांवर बसवलं. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळवलं. तर दोन्ही काँग्रेसनं सत्तेत भागीदारी मिळवली. मात्र राज्य पातळीवरील ही महाविकास आघाडी अद्यापही तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रुचली नाही.
राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी समोर येत असतात. त्यात आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना(Shivsena) नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील(Shivaji Adhalarao Patil) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी आम्ही मान्य केली असून आम्ही आघाडीची तत्वं पाळत आहोत परंतु शिवसेना संपवण्याचा डाव जिल्ह्यात सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आमची जास्त काहीही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच महाविकास आघाडीबद्दल गेल्या २ वर्षापासून खूप वाईट अनुभव आहे. खेड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती ६ महिने जेलमध्ये राहावं लागलं. लांडेवाडी येथे होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीली परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळं कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केले आहे. शिवसैनिकांना जगू द्या, शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारु नका. गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही. आम्हाला जगू द्या. वरिष्ठांच्या कानावर वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत अशी खंतही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
खेडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत वादंग
मागील खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून आलं. याठिकाणचे खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराविरोधात शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी अनेकदा आरोप केले. या आरोपाचे पडसाद राज्य पातळीवरही उमटले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल असं राऊतांनी म्हटलं होतं.