देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:32 PM2022-06-30T18:32:08+5:302022-06-30T18:33:13+5:30
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांना भाजपाचा पाठिंबा देणार असून या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकीकडे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा असतानाच फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक लगावत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, यावर लगेचच बोलण्यासारखं काही नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. यावर लगेचच बोलण्यासारखं काही नाही. पुढे कसं काय होतंय ते पाहू. हे थोडं अनपेक्षित होतं, पण लगेच काही प्रतिक्रिया माझ्याकडे आहे असं वाटत नाही,” असं मनिषा कायंदे म्हणाल्या. टीव्ही ९ शी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यासंदर्भात काहीच बोलता येणार नाही. सध्या काय चाललंय हे पाहावं लागेल, अभ्यास केल्यावरच यावर बोलता येईल असंही त्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.
स्वागत करायचं म्हणजे काय? हे जर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवलं होतं, त्यांनी सर्वकाही सोडायची तयारी दाखवली होती. पण यावर काही बोलणं हे खुप लवकर होईल, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांना पुन्हा स्वीकारतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. स्वीकारायचा काही विषय नाही. उद्धव ठाकरे जो आदेश आम्हाला देतील तो मान्य असल्याचंही त्या म्हणाल्या.