...तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:36 PM2019-09-09T14:36:17+5:302019-09-09T14:36:56+5:30
शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर आंबेडकरांचं भाष्य
मुंबई: शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा सोडू नये. अन्यथा आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल, असा इशारा भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. शिवसेनेनं जागावाटपावेळी मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडू नये. त्यांनी आपल्या मागणीवर कायम राहावं, असंदेखील आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
येत्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचित बहुजन आघाडीकडे जाईल, असं विधान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर भाष्य करताना निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी विरोधात नसेल, तर सत्तेत असेल असं आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या 'गॅस सिलिंडर' निशाणीचा उल्लेख करत विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे भाजपा गॅसवर असेल, असंही ते पुढे म्हणाले.
काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 'काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता. मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे', अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.