अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 10:36 PM2019-01-06T22:36:53+5:302019-01-06T22:38:30+5:30

भाजपानं ईव्हीएमसोबतची युती जाहीर केली- शिवसेना

shiv sena slams and challenges bjp ahead of lok sabha election | अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान

Next

मुंबई: लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपानं ईव्हीएमसोबतची युती जाहीर केली आहे, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. लातूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचे संकेत दिले. त्यावर शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला शिवसेना कायम तयार असतेच. त्यामुळे येऊ द्या अंगावर, होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही, असं थेट आव्हान शिवसेनेकडून भाजपाला देण्यात आलं आहे. 

आज लातूरमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये अमित शहांनी त्यांच्या भाषणातून शिवसेनेचा सूचक इशारा दिला. मित्र सोबत आले ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांनाही धोबीपछाड देऊ, असं शहा म्हणाले होते. शहांच्या या विधानाचा शिवसेनेनं समाचार घेतला. 'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमfत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार असा नारा दिला. हा नारा झोंबल्यामुळेच आणि शिवसेनेच्या आसूड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभदेखील सरकू लागली आहे', अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. 

पाच राज्यांमधील पराभवामुळे भाजपाचं अवसान गळाल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. 'भारतीय जनतेनं भाजपाला त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यातील लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपानं आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलेच आहे. तसेही त्यांच्या अनिल गोटे नावाच्या आमदारानं धुळे महानगर पालिकेत त्यांचं भांडं फोडलंच आहे. त्यामुळे आता होऊन जाऊ द्या. शिवसेना तसंही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच. येऊ द्या अंगावर. होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा धारदार शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे.
 

 

Web Title: shiv sena slams and challenges bjp ahead of lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.