Maharashtra Politics: “भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:31 AM2023-02-16T09:31:14+5:302023-02-16T09:32:10+5:30

Maharashtra News: मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

shiv sena slams assam bjp govt over claims on bhimashankar jyotirlinga | Maharashtra Politics: “भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल”

Maharashtra Politics: “भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल”

googlenewsNext

Maharashtra Politics: माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर तर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे. देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, अशी घणाघाती टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. त्यांच्या बाता विकासाच्या असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हक्काचे हिरावून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत, या शब्दांत शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. 

सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचे स्पष्ट उल्लेख

आता या ‘पळवापळवी’त आसाममधील भाजप सरकारची भर पडली आहे. या सरकारने महाराष्ट्रातील एका ज्योतिर्लिंगावरच मालकी हक्काचा दावा ठोकला आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचे आहे, असे आसाम सरकारने म्हटले आहे. वास्तविक पुण्याजवळील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आहे, ही खूप जुनी मान्यता आहे. शिवलीलामृत, शिवपुराण आणि इतर मान्यताप्राप्त धार्मिक ग्रंथांत सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे. 

महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार

उपटसुंभ आसाम सरकार म्हणत आहे की, सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नसून आसाममधील आहे. हा महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार आहे. हा ‘साक्षात्कार’ तुम्हाला आधी का झाला नाही? मग आताच हा नसता उपद्व्याप आसामच्या भाजप सरकारने का केला? महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे; त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

दरम्यान, आसाम सरकारने यांच्या नाकावर टिच्चून आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर मालकी हक्क सांगितला आहे. मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांची ही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे. महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे काही द्यायचे नाही, हक्काचे उद्योग, प्रकल्प इतर भाजप राज्यांत पळवून न्यायचे आणि येथील जनतेच्या प्रखर विरोधाकडे दुर्लक्ष करीत विनाशकारी ठरणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारायचे. देशाची ‘आर्थिक राजधानी’ हा मुंबईचा ‘मुकूट’ हिरावण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत, या शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena slams assam bjp govt over claims on bhimashankar jyotirlinga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.