Maharashtra Politics: “बळीराजा अंधारात, मिंधे सरकारची दिवाळी जोरात, जनतेचे काय?”; शिवसेनेची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 09:06 AM2022-10-24T09:06:41+5:302022-10-24T09:07:31+5:30

Maharashtra News: ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? असे अनेक प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले.

shiv sena slams eknath shinde and bjp devendra fadnavis govt over current situation in the state in saamana editorial | Maharashtra Politics: “बळीराजा अंधारात, मिंधे सरकारची दिवाळी जोरात, जनतेचे काय?”; शिवसेनेची घणाघाती टीका

Maharashtra Politics: “बळीराजा अंधारात, मिंधे सरकारची दिवाळी जोरात, जनतेचे काय?”; शिवसेनेची घणाघाती टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: यंदाचा दिवाळीचा सणही सालाबादप्रमाणे हर्षोल्हासात साजरा होत असला तरी या आनंदोत्सवालाही चिंतेची आणि काळजीची एक किनार आहेच. राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. राज्यातील बळीराजा अंधारात चाचपडत आहे. सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? हा प्रश्न कायमच आहे, या शब्दांत दिवाळीच्या दिवशीच शिवसेनेने सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहे. 

शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदीचे सावट, बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात बळीराजा सापडलेला आहे. अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे, अशी टीका केली आहे. 

मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी करतेय

पगार, बोनस मिळत नसलेल्या गरीब शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या मंडळींच्या नशिबी मात्र खरेदीची ही चंगळ नसते. त्यातूनही असेल तेवढ्या उत्पन्नातून चार पैसे वाचवून मुलाबाळांसाठी फटाक्यांची खरेदी, थोडेफार गोडधोड करून दिवाळीचे स्वागत करण्याचा प्रयत्न जो तो करीत असतो. याचा अर्थ लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये. केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.

सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही. रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा, असे शिवसेनेने म्हटले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena slams eknath shinde and bjp devendra fadnavis govt over current situation in the state in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.