Maharashtra Politics: “बेताल शहर नियोजन अन् दिखाऊ स्मार्ट सिटी”; पावसाने पुण्याला आणि शिवसेनेने भाजपला झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 09:06 AM2022-10-22T09:06:24+5:302022-10-22T09:07:26+5:30
Maharashtra News: पुणे महापालिकेसारखी स्मार्ट सिटी आणि विकास कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
Maharashtra Politics:पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. अलीकडेच पुण्यात दोन तासांत सुमारे १२५ मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. यावरून शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेने आपले मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे!, या शब्दांत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत
एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. पुण्याच्या तथाकथित विकासाचे रस्त्यारस्त्यांवर जलार्पण झाले. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले. मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावूपणा
ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानांमध्ये भरलेला माल भिजताना हतबलतेने पाहावे लागले. अन्नधान्याचा चिखल झाला. हे ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात घडले. पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले, असा चिमटा शिवसेनेने काढला. देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावू, शोभेची कामे करण्यातच रस दाखविला गेला, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"