JNU Attack: 'बुरखा घालून काळोखात हल्ले करणं म्हणजे मर्दानगी नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 07:39 AM2020-01-07T07:39:58+5:302020-01-07T07:42:35+5:30
जेएनयूतील हिंसाचारावरुन शिवसेनेकडून मोदी-शहांचा समाचार
मुंबई: तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणं ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज असल्याचं म्हणत शिवसेनेनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मारहाण प्रकरणावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. देशात अराजकता निर्माण करणारं राजकारण धोकादायक आहे . अशानं देशाचे तुकडे पडतील, समाजास तडे जातील. विद्यापीठं, महाविद्यालयं रक्तानं भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतकं निर्घृण राजकारण कधी कोणी केलं नव्हतं. 'जेएनयू'तील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत . मोदी - शहांना जे हवं तेच घडताना दिसत आहे. देश संकटात आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं 'सामना'मधून भाजपावर तोफ डागली आहे.
'चेहरे झाकलेल्या अज्ञात हल्लेखोर टोळीने 'जेएनयू'मध्ये हिंसाचार केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि 'जेएनयू' विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचं हे चित्र आहे. चेहरे झाकून एक टोळकं आत घुसलं व त्यांनी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला. त्यात शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणं ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. 26/11 चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता 'जेएनयू'त तेच चित्र दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीतच आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी सरकारी पत्रके वाटण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गृहमंत्र्यांवर ही काय वेळ आली आहे?,' असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
'नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली. या कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंनाही बसत आहे. त्यामुळे हिंदूही चिडले. या कायद्यामुळे 'भाजप विरुद्ध बाकी सर्व' अशी स्थिती निर्माण झाल्यानं भाजपची गोची झाली आहे व त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा 'राडा' त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे. 'जेएनयू'मधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. देशातील विद्यापीठं राजकारणापासून दूर राहणं गरजेचं आहे. येथे केवळ विद्यार्जनाचंच काम व्हावं असं भाजपनं सांगितलं आहे, पण गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे व त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे?,' असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले आहेत.