Maharashtra Politics: “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसतेय”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:42 AM2023-01-17T08:42:47+5:302023-01-17T08:43:45+5:30

Maharashtra News: मिंधे-फडणवीसांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, असा दावा शिवसेनेने केला आहे.

shiv sena slams shinde fadnavis govt over accident of opposition party leaders in saamana editorial | Maharashtra Politics: “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसतेय”

Maharashtra Politics: “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसतेय”

googlenewsNext

Maharashtra Politics: जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा! असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा, असे सांगत हाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणी करत, महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला. जादूटोणा वगैरे अंधश्रद्धेस मूठमाती देण्यासाठी सरकारने कायदा केला, पण महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते, असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे. 

जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांचे अपघाताचे प्रमाण अचानक वाढू लागले   

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, असा मोठा दावा शिवसेनेने केला आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले, असे दाखले शिवसेनेने सामना अग्रलेखात दिले आहेत. 

उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले

अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांना झालेल्या अपघातांसह शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले. ते गेल्या काही काळापासून भाजपच्या विरोधात बोलू लागले होते. विरोधकांना अशा प्रकारे इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरील अखेरच्या काळात भयंकर आजारास सामोरे जावे लागले. त्यांच्यावर अचानक अवघड व जीवघेण्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे काही काळ ते अत्यवस्थ झाले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयोग सुरू झाले. म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग हे आधीपासूनच सुरू होते, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. 

दरम्यान, हाविकास आघाडीतील सर्व प्रमुख लोकांवर अपघात, घातपात, चौकश्यांची संकटे एकापाठोपाठ कोसळत आहेत. त्यामागे मुख्यमंत्र्यांचे ‘जादूटोणा’ प्रेम आहे असे लोकांना वाटत असेल तर संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे अशा अंधश्रद्धांविरुद्ध लढणाऱ्या समाजधुरिणांचा तो पराभव ठरेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर गेले की, ते एखादा ज्योतिषी अथवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेले नाही. ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपघात व घातपाताची नाट लागली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena slams shinde fadnavis govt over accident of opposition party leaders in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.