Maharashtra Politics: “हिंमत असेल तर संतोष बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा आणि...”; शिवसेनेचे खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 09:58 PM2022-09-26T21:58:30+5:302022-09-26T21:59:29+5:30
Maharashtra News: तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो आणि खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये, असा पलटवार शिवसेनेने केला आहे.
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असून, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. यातच संतोष बांगर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेनेही खुले आव्हान दिले आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांनी बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आतापर्यंत ११ शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी जशास तसे उत्तर देण्याचा धमकीवजा इशारा शिवसैनिकांना दिला होता. त्याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर देताना खुले आव्हान दिले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी संतोष बांगर यांच्यावर पलटवार केला आहे.
हिंमत असेल तर संतोष बांगरांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा
हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावा. माझे त्यांना आव्हान आहे. तुम्ही कधी, किती लोकं घेऊन येता आम्हाला सांगा. वेळ, ठिकाण आणि तारीख त्यांनी सांगावी. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कोण तेव्हा तुम्हाला दाखवू. तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो. दुसऱ्या दिवशी खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये, असे सांगत सुर्यवंशी यांनी संतोष बांगरांना चांगलेच डिवचले आहे.
दरम्यान, संतोष बांगर हे आपल्या कुटुंबियांबरोबर अमरावतीला देवदर्शनासाठी गेले होते. तेव्हा काही शिवसैनिकांनी बांगर यांनी गाडी आडवत त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसते तर एक घाव दोन तुकडे केले असते, अशी इशारावजा धमकीच संतोष बांगर यांनी दिली. यानंतर संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.