शिवसेनेला पाठिंबा, पवारांकडून संकेत!
By admin | Published: February 27, 2017 06:00 AM2017-02-27T06:00:17+5:302017-02-27T06:00:17+5:30
मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.
मुंबई/ नांदेड : मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजपा वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून खा. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या असून, एका अपक्षासह विजयी झालेल्या तीन बंडखोर उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी, सेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपाकडे ८२ जागा आहेत. संख्याबळानुसार शिवसेना किंवा भाजपा दोन्ही पक्ष स्वबळावर महापौर निवडून आणू शकत नाहीत. एकतर दोघांना एकत्र यावे लागेल, अथवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरच पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसने घातली आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या विधानाला महत्त्व आहे.
नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना खा. पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत केले होते. मात्र, सत्तेपासून भाजपा वा सेना कोणीही दूर राहू शकणार नाहीत, त्यामुळे सरकार पडण्याची शक्यता नाही़ मध्यावधीची वेळ आलीच तर आमची तयारी आहे. पण ती शक्यता दिसत नाही, असे सांगून ते म्हणाले, मुंबई महापालिकेत काय घडेल हे सांगू शकत नाही. मात्र, कारभार सुरळीत चालावा एवढीच आमची अपेक्षा आहे. गरज पडली तर भाजपा वगळून इतरांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सूचक विधान पवार यांनी केले.
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. पुणे महापालिकेत कमी पडलो हेही त्यांनी मान्य केले़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास राज्यात जवळपास १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळू शकते. मात्र ती झाली नाही, तर केवळ ४ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता येईल. त्यामुळे आघाडीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून मी स्वत: अनुकूल आहे़, असे पवार यांनी सांगितले.
कोणाला कुठे आहे संधी?
निवडणूक झालेल्या २५ जिल्हा परिषदांपैकी नांदेड, अहमदनगर, अमरावती आणि सिंधुदुर्ग या चार जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असून पराभणी, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, आणि सातारा या सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. हिंगोलीत काँग्रेस (१२), राष्ट्रवादी (१२) आणि शिवसेना (१५), भाजपा (१०) असे संख्याबळ आहे. तीन जागा अपक्षांकडे आहेत. त्यामुळे अपक्ष ज्यांच्याकडे त्यांची सत्ता, असे चित्र आहे. कोल्हापूरमध्ये दोन्ही काँग्रेसकडे मिळून २५, तर शिवसेना-भाजपाकडे २४ जागा आहेत. एक अपक्ष आणि १७ जागा स्थानिक आघाडीकडे असल्याने कोल्हापुरात काहीही घडू शकते. सांगलीत भाजपाकडे (२३) सर्वाधिक जागा असून शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ही जिल्हा परिषद युतीकडे संख्याबळ जास्त असले तरी काँग्रेस (१०) आणि राष्ट्रवादीकडे (१४) जागा आहेत. शिवाय, स्थानिक आघाडीकडे १० जागा असल्याने येथेही आघाडी आणि युतीला समान संधी आहे. रायगडमध्ये शेकापकडे सर्वाधिक २३ जागा आहेत. दोन्ही काँग्रेससोबत आघाडी झाली तर ही जिल्हा परिषद शेकापच्या ताब्यात जाऊ शकते. गडचिरोलीत भाजपाकडे सर्वाधिक २० जागा असल्या तरी काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (५) आणि स्थानिक आघाडीकडे ११ जागा आहेत. त्यामुळे इथेही भाजपा आणि काँग्रेसला समान संधी आहे. शिवसेना-भाजपाची युती झाली औरंगाबाद, लातूर, जालना, चंद्रपूर, वर्धा, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नाशिक, रत्नागिरी या १० ठिकाणी युतीची सत्ता येऊ शकते. (प्रतिनिधी)
>काँग्रेसचा पाठिंबा? थोडं थांबा!
मुंबई महापौरपदासाठी शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘काँग्रेसचा पाठिंबा? थोडं थांबा!’ असे टिष्ट्वट केल्याने राजकीय पतंगबाजीला ऊत आला आहे.
>सर्वपक्षीय नेते भेटले : खा. शरद पवार यांच्या भेटीसाठी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय
नेत्यांची रीघ लागली होती. त्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शिवसेनेचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़ हेमंत पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा समावेश होता. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनीही पवारांची स्वतंत्रपणे भेट घेतली़
>मुंबई महापालिकेत काय घडेल हे सांगू शकत नाही. मात्र, कारभार सुरळीत चालावा एवढीच आमची अपेक्षा आहे. गरज पडली तर भाजपा वगळून इतरांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील.